राज्य सरकारने 2024 25 चा अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळावा म्हणून या योजनेतील वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. त्याचबरोबर सुरुवातीला डोमासाईल सारखी आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी मागण्यात आली होती. परंतु आता एक ते कागदपत्रे नसल्यास महिलांना कागदपत्रांबद्दल पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चला तर मग ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने’चा ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करता येईल याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत. महिलांसाठी ही योजना सुरू केल्यामुळे महिलांनी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सेतू केंद्रात बाहेर गर्दी केली होती. हे पाहता आता महिलांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून फॉर्म भरता यावा म्हणून ॲप लॉंच करण्यात आले आहे. त्यामुळे आता महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही ऑनलाईन स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
तर महिलांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जाऊन ‘नारीशक्ती दूत’ नावाचे ॲप डाऊनलोड करावे लागेल. या ॲपवर फेटा घातलेली महिला दिसेल. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. ॲप व्हेरिफाय करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल. यानंतर तुमच्यासमोर नारीशक्ती नावाचे ॲप ओपन होईल.
त्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असे दिसेल. महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज दिसतील. तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पूर्ण ऑनलाइन फॉर्म ओपन होईल.
सर्वप्रथम त्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाची विचारणा केली जाईल. तुमचे नाव प्रविष्ट करावे लागेल. त्यानंतर पती किंवा वडिलांचे संपूर्ण नाव तुम्हाला तेथे द्यावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा जन्मतारीख निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला कायमचा पत्ता आणि इतर माहिती द्यावी लागेल. ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत याचे पर्याय क्लिक करावे लागेल. पिन कोड, तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक तेथे भरावा लागेल. त्याचबरोबर तुम्ही इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहात की नाही याचे उत्तर द्यावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे विवाहित स्थिती नोंदवावी लागेल.
तुम्हाला तुमच्या बँकेचे तपशीलही तेथे भरावे लागणार आहे. तुमच्या बँकेचे नाव, खातेदाराचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का याची माहिती द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डचा फोटो अपलोड करावा लागेल.
तसेच बँक पासबुकचा फोटो उत्पन्नाचा दाखला ज्यांचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्यांना यामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला रेशन कार्डचा फोटो तेथे अपलोड करावा लागेल. अधिवास पत्र म्हणजेच डोमासाईल नसल्यास तुम्हाला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड तेथे अपलोड करता येईल. ऑनलाइन पद्धतीने हमीपत्र तेथे दाखवण्यात येईल त्याला तुम्हाला स्वीकारावे लागेल आणि सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल.
Ladki Bahin Yojana Form
ऑफलाईन पध्द्तीने अर्ज कसा करावा?
ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे शक्य नाही त्या महिला ऑफलाइन पद्धतीने देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पीडीएफ डाऊनलोड करून त्याचा फॉर्म आणावा लागेल त्यावर तुम्हाला नाव आणि विचारलेली सर्व माहिती लिहावी लागेल. त्यासोबत हमीपत्राची पूर्तता करावी लागेल. यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे फॉर्मला जोडून द्यावी लागतील. हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने सबमिट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाइन अर्ज ही करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास पत्र (डोमासाईल) / जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला / पिवळे केशरी रेशन कार्ड
- बँक पासबुक
- हमीपत्र