राज्यात मान्सूनने आगमन केल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आहे. मान्सूनचा जोर 15 तारखेपासून कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 20 तारखेनंतर पेरणी करावी असा कृषी सल्ला (Agricultural Advisory) देण्यात आला आहे. यंदा खरीपाच्या क्षेत्रात 1 लाख 10 हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे बियाणे आणि खते (Fertilizer) यांच्या पुरवठ्यात बारकाईने लक्ष देऊन बोगस विक्रेत्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिले आहेत.
खरीप हंगामासाठी किती बियाणे मंजूर?
यंदा 18 लाख क्विंटल इतकी बियाण्याची मागणी आहे. परंतु वाढत्या क्षेत्राचा विचार करता 24 लाख क्विंटल बियाणे राज्य सरकारने मंजूर केले आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळेत बियाणे मंजूर करून देण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. सध्या शासनाकडून 13 लाख क्विंटल बियाणे वितरीत करण्यात आले आहेत. तर उर्वरित 6 लाख क्विंटल बियाणे लवकरच वेळेत वितरीत केले जातील.
बोगस विक्रेत्यांवर थेट कारवाईचे निर्देश
शेतकऱ्यांना बियाणे आणि खते ही योग्य भावात मिळावीत. त्याचबरोबर बियाणे व खतांचा साठा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी कायदे देखील प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यासह शेतकऱ्यांना बियाणे व खते योग्य भावात आणि मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कापूस-सोयाबीन योजना आणि अन्य योजनांसोबतच महाबीजच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी बी-बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.