महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कामगारांसाठी आरोग्य विमा सेवा योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रांध्ये काम करणाऱ्या कामगार लाभार्थी असतात. त्यांचा आरोग्य विमा शासनामार्फत काढला जातो. त्यासंदर्भात आज आपण माहिती मिळवणार आहोत.
योजनेविषयी माहिती
राज्य कामगार विमा अधिनियम 1948 अंतर्गत लागू करण्यात आलेली राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मुख्य योजना आहे. या योजनेत 14 इस्पितळे, व 61 दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर 1954 मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या महाराष्ट्र राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.
कामगारांना मिळणारा लाभ
कामगार विमा योजनेची अंमलबजावणी केलेल्या क्षेत्रांमध्ये कामगारांना एक वैद्यकीय व समान दराने रोख स्वरुपात अशा दोन पद्धतीने लाभ दिला जातो. दहा किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या सर्व कारखान्यांना राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत या योजनेचा लाभ मिळवता येतो. आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आरोग्य विमा मिळवून देता येतो. या योजनेत पात्र होण्यासाठी रु १५०००/- ही कमाल वेतन मर्यादा आहे.
योजनेचा लाभ कसा घ्यावा?
तुम्ही महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत कामगार असाल तर https://arogya.maharashtra.gov.in/ या लिंकवर जाऊन योजनेसंबंधीत अधिक माहिती मिळवू शकता व या योजनेचा लाभ देखील घेऊ शकता.
राज्य कामगार विमा योजना अधिनियम
राज्य कामगार विमा योजना अधिनियम 1948 मध्ये आजारपण, मातृत्व, तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपाचे अपंगत्व, काम करातना झालेल्या इजेमुळे होणारे मृत्यू व त्यामुळे कमविण्याच्या क्षमतेत होणारी घट यासारख्या आकस्मिक घटनांमध्ये कामगारांच्या आरोग्य हक्काचे रक्षण केले जाते.