अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्पात विविध आर्थिक घोषणा केल्या. भाड्याने घरे देणाऱ्या घर मालकांकडून होणारी करचोरी रोखण्यासाठी अर्थसंकल्पात नियम बदलण्यात आले आहेत. तुम्ही तुमची रुम भाड्याने दिली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
घरांच्या भाड्याचे उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न नाही
ज्यांनी ज्यांनी त्यांचे घर किंवा प्लॅट भाड्याने दिले असेल असे सर्व घरमालक यापुढे भाड्याच्या घरांचे उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न म्हणून दाखवू शकणार नाहीत. कारण यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये रेंटल इन्कम संदर्भात अर्थमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यावर्षीपासून भाड्यातून होणाऱ्या कमाईविषयी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सध्या देशभरातील करदाते घर भाड्यातून मिळणारे उत्पन्न व्यवसाय किंवा इतर उत्पन्न स्रोत म्हणून दाखवून कर कपातीचा दावा करत आहेत परंतु यापुढे त्यांना तसे करता येणार नाही.
घर भाड्यातून होणाऱ्या कमाईवर आयकर नियम बदलले
घर भाड्याने देऊन कमाई करणाऱ्या लोकांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची तरतूद करण्यात आली आणि ती म्हणजे की, आता आयकर भरताना घर किंवा फ्लॅट भाड्याने देऊन मिळणारे उत्पन्न व्यवसायाचे उत्पन्न म्हणून दाखवता येणार नाही तर घरांच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न म्हणून घोषित करावे लागेल. निवासी मालमत्ता भाड्याने दिल्याने मिळणारे उत्पन्न आता व्यवसाय किंवा कोणत्याही व्यवसायातील उत्पन्नाऐवजी ‘घराच्या मालमत्तेचे उत्पन्न’ अंतर्गत दाखवावे लागेल. अशाप्रकारे, या नव्या नियमामुळे घर भाड्यावर देऊन कमाई करणाऱ्या लोकांचे कर दायित्व वाढण्याची शक्यता असून अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ही तरतूद पुढील आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल ज्यामुळे आयकर भरणाऱ्यांना चुकीच्या उत्पन्नाच्या नावाखाली कमी कर भरण्यापासून रोखले जाईल.
करचोरीला बसणार आळा
सध्या करदाते ITR करताना भाड्यातून होणारे उत्पन्न व्यवसाय किंवा व्यवसायातील नफा म्हणून घोषित करतात त्यामुळे आपोआप त्यांचा कर वाचतो. त्याने देशाच्या तिजोरीवर परिणाम होतो. घरमालक त्यांच्या भाड्याने दिलेल्या घराचा देखभाल खर्च आणि दुरुस्ती यांसारख्या गोष्टींसाठी कपातीचा दावा करतात. उत्पन्नाचा चुकीचा अहवाल देऊन करदाते करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी करतात आणि त्यांना कमी कर भरावा लागतो. परंतु आता नव्याने बनवलेल्या नियमामुळे घरमालकांना करचोरी करता येणार नाही.