भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना त्यामध्ये सोन्याच्या कस्टम ड्यूटी संदर्भात खूप मोठी घोषणा केली. सोन्याच्या आयात शुल्कात सुधारणा केल्यानंतर जवळपास चक्क महिन्याभरानंतर 23 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने ड्युटी ड्रॉबॅक रेटमध्ये कपात केली आहे. नवीन अधिसूचनेनुसार, सोन्याच्या दागिन्यांसाठी ड्युटी ड्रॉबॅक रेट 704.1 रुपये प्रति ग्रॅम शुद्ध सोन्याच्या मात्रे प्रमाणे 335.50 रुपये प्रति ग्रॅम करण्यात आला आहे,
ड्युटी ड्रॉबॅक रेट म्हणजे काय?
ड्यूटी ड्रॉबॅक म्हणजे भारतात आयात केलेल्या विशिष्ट श्रेणींच्या वस्तूंवर भरलेले शुल्क, नंतर भारतातून त्या वस्तू निर्यात केल्या जातात तेव्हा शुल्क आणि कर यांचा परतावा दिला जातो. तुम्ही एखाद्या दुकानात एखादी वस्तू परत करता तेव्हा विक्री कर कसा परत केला जातो त्याचप्रमाणे, तुम्ही पूर्वी आयात केलेली एखादी वस्तू निर्यात करता तेव्हा तुम्ही शुल्क परतावा मागू शकता. ड्युटी ड्रॉबॅक रेट ही एक रक्कम आहे ज्याचा उद्देश निर्यातदारांना आयात केलेल्या इनपुटसाठी भरलेल्या कस्टम ड्युटीची परतफेड दिली जाते. निर्यातीसाठी जाणाऱ्या मालावर देशांतर्गत कराचा कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.
सोन्या चांदीच्या किंमतीत बदल
अहवालानुसार, चांदीचे दागिने आणि इतर चांदीच्या वस्तूंचा दर 8,949 रुपये प्रति किलो (.999 शुद्धता) वरून 4,468.10 रुपये प्रति किलो इतका कमी झाला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर चांदीपासून बनवलेल्या वस्तूंच्या दरात एकसमानता आली आहे.
अर्थसंकल्प 2024 मध्ये निर्णयाची घोषणा
दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, “देशातील सोने आणि मौल्यवान धातूच्या दागिन्यांमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन वाढविण्यासाठी, मी सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्के आणि प्लॅटिनमवर 6.4 टक्के करण्याचा प्रस्ताव देत आहे.”
सामान्य जनतेला याचा फायदा
अर्थसंकल्पात घोषणा करण्याआधी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. तब्बल एक तोळे सोन्याचे दर 75 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. तेच आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 67 हजारांपर्यंत आले आहेत. म्हणजे केवळ एका महिन्यातच सोन्याचे दर 8 हजारांनी कमी झाल्याचे आपण पाहत आहोत. यामुळे नक्कीच सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना नक्कीच फायदा होत आहे. सोन्याच्या वाढलेल्या दरांमुळे अनेकांना सोने चांदींच्या दागिन्यांची खरेदी करताना खूप जास्त पैसे खर्च करावे लागत होते, तेच आता त्यांचे प्रत्येक तोळा सोन्यामागे 8 हजारांपर्यंत रुपये वाचत आहेत.