यंदा राज्यात मान्सूनने लवकरच प्रवेश केला आहे. गुरुवारी 6 जून रोजी मान्सूनने राज्यात प्रवेश केला, परंतु आज देखील मान्सूनने तिथेच मुक्काम ठोकला. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असून पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) पिकांना दिलासा मिळत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे करपलेली पिके आता मान्सूनमुळे पुन्हा नव्याने जोमात येणार आहेत. चल तर मग मान्सून (Monsoon) राज्यातील कोणत्या भागांत दाखल होईल हे जाणून घेऊयात.
राज्यातील कोणत्या भागांत मान्सूनने केला प्रवेश?
राज्यातील सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सोलापूर या जिल्ह्यांत काल मान्सून दाखल झाला होता. त्यासह कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागात देखील मान्सूनने प्रवेश केला. मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्यामुळे पुढचे तीन ते चार दिवस मान्सून राज्यातील उर्वरित भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
कोणत्या भागांत मान्सून होणार दाखल?
मान्सून आता राज्यातील इतर भागही व्यापणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर मान्सून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा व बंगालच्या उपसागराचा अजून काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. आज राज्यातील बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश व विदर्भातील पुढचे चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांनाही उष्मघातापासून दिलासा मिळणार आहे.